व्हाटसप्प चॅनल जॉइन करा

महिलेची वाट अडवून अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

लाईव्ह नाशिक न्युज :नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात एका महिलेसोबत घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला बसमधून उतरत असताना एक रिक्षाचालक अचानक तिच्या समोर आला आणि तिची वाट अडवली. त्यानंतर त्या व्यक्तीने नग्न होऊन महिलेसमोर अश्लील हावभाव करत अत्यंत लज्जास्पद कृत्य केले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या बसचालक आणि वाहकाने महिलेची मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांच्यावरही हात उगारला. त्यांना मारहाण करत बसवर दगडफेक केली आणि वाहनाचे नुकसान केले. या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिजान रजा हा आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे. नाशिकमध्ये पूर्वी झालेल्या दंगली आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग राहिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला अटक केली आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment