नाशिक, १२ एप्रिल २०२५ – आज हनुमंत जयंतीनिमित्त हजारो भाविकांनी अंजनेरी पर्वतावर दर्शनासाठी गर्दी केली होती. हनुमान जन्मस्थळ मानल्या जाणाऱ्या या पवित्र ठिकाणी सकाळपासूनच भाविकांचा ओघ सुरू होता. मात्र, एका अनपेक्षित घटनेमुळे उत्सवात गोंधळ उडाला.
सकाळी अंदाजे साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका भाविकाने मंदिर परिसरात मोठ्या आवाजात शंखनाद केला. या अचानक झालेल्या आवाजामुळे परिसरातील माकडे सैरभैर पळू लागले त्यात काही माकडांनी मधमाशांच्या पोळ्यांजवळ गोंधळ घातल्याने मधमाशा उडाल्या.
काही क्षणांतच मधमाशांनी आजूबाजूच्या भाविकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सुमारे ९-१० भाविक जखमी झाले असून त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, या परिसरात मोठ्या प्रमाणावर मधमाशांची पोळी आहेत आणि यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. प्रशासनाने याची नोंद घेऊन भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने भाविकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, पुढील वर्षीपासून अशा घटना टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाय योजण्याचे आश्वासन दिले आहे.